श्रावणघना...
श्रावणाचा
रंग पाचूचा
त्यात
गंध कुसुमांचा
थेंबांचे
पैंजण पायी
आनंद
सोहळ हा पहा
अवनीच्या
सृजनोत्सवाचा
चोहिकडे
जरा नजर फिरवल्यास निसर्गाचे अतिशय विलक्षण असे सौंदर्य दृष्टीस पडत आहे. हिरवीगार झालेली वनसृष्टी जनमानसाला
सृजनतेचे वरदान देत आहे. किती
द्यावे अन् किती घ्यावे, काय
द्यावे अन् काय घ्यावे असा हा सौंदर्य सोहळा धरतीच्या सृजनाचा. किती ते अप्रूप या धरती मातेचे. पहिल्याच भेटीत पावसाच्या, आनंदाचे कुंभ जणू धरतीने आपल्या ह्रदयात
सामावून घेतले आहे. आणि आता दातृत्वाचे डोहाळे लागल्यागत ही
धरती माता जनमानसाला अप्रुपाचे भरभरून दान देते आहे. सर्वात आधी तिने आपल्या पोटातून भाज्या, फळे, फुले प्रसवली आहेत. पानाफुलांमध्ये जणू अमर्यादसा रंगोत्सव
चालला असून, नानाविध कुसुमांचा बागा, उद्यानामध्ये रंगमेळ चालू आहे.
हे
सृष्टीचे सौंदर्य घर बसल्या अनुभवता येत नाही. त्यासाठी सृष्टीच्या , निसर्ग देवतेच्या सहवासात राहिले पाहिजे. थोडासा वेळ आणि सवड काढून जरा पहा या
सृष्टीचे सौंदर्य. एैसपैस विस्तारलेले हिरवे मखमली गालिचे. त्या गालिच्यांवर नुकतीच पिवळी, जांभळी, पांढरी नाजुक फुले फुलण्यासाठी आतुरली
आहेत. किती नाजूक आणि मनमोहक असतात ही फुले. चिमटीतही मावत नाही अशा या फुलांना
सृष्टी देवतेने सौंदर्याचा कृपाशिर्वाद दिला आहे. वर्षभर कुठे लपतात ही फुले? आणि मग पावसाच्या पहिल्याच शिडकाव्याने
मातीखाली लपलेली बीजे धरतीच्या पोटातून माना वर करून डोकावू लागतात. जणू काही त्या सांगतात आम्हीही आहोत. या सृष्टीच्या अस्तित्वाचा महत्वाचा भाग
आहोत आपण, हे मानवाला ही नाजुकशी फुले सांगत असतात. निसर्गाशी बोलायचं असेल, त्याला अनुभवायच असेल तर मग डोगर
कपारीतून वाट काढत जावं. आणि मग
मनमुराद आनंद लुटावा सृष्टीचा. या
निसर्गाच्या नवलाईचा. वनराजी, वनराईने पावसाशी सलगी करून
वर्षभराचे जादुई जल आपल्यात सामावून घेतले आहे. या पावसाने जादुची कांडी फिरवल्यागत
निसर्गाला तृप्तीचे, सौंदर्याचे, ऐश्वर्याचे आंदण बहाल केले आहे. जरा पहा या निसर्गाकडे. जरा पहा या सृष्टी देवतेकडे. जरा अधिक लक्ष दिल्यास वृक्षराजींचा
चाललेला खेळ आपल्या लक्षात येईल. श्रावणाच्या
या नवलाईचा आनंद, ही उंचच वृक्षवल्ली एकमेकांना वाटत आहेत. बघा जरा, जणू असंख्य करांनी ही वृक्षवल्ली
एकमेकांना आलिंगन देऊन धरतीच्या सृजनोत्सवाचा आनंद लुटत आहेत. जणू वारा या झाडांच्या कानांमध्ये
काहीतरी गोड गुपीत सांगतो आहे, आणि
त्यामुळे वेडावलेली, माधुर्याने ओथंबलेली ही झाडे, लाजलाजून एकमेकांशी हितगुज करीत आहेत. यांना भानच उरले नाही, की आपल्याला कोणतरी न्याहाळतो आहे, पाहातो आहे. ही वृक्षराजी निसर्गाला कवेत घेऊन
पावसाचे गुणगान करीत आहे. आपण
मानवजन मात्र याकडे केवळ जीवहीन झाडे म्हणून यांच्याकडे बघत असतो. भलेही झाडांना या वृक्षराजींना शब्दांची
भाषा कळत नाही. परंतु प्रेम करायला शिकवणारी मौनातली
भाषा त्यांना या वेड्या पावसाने शिकवली आहे, ती भाषा जणू ही वृक्षराजी बोलत असते, असेच जणू भासते. आपल्या बागेतल्या सुंदर मनमोहक फुलांकडे
पहा जरा. त्यावर सांडलेले थेंबांचे मोती अधिकच
खुलून दिसतात नाही?आणि ही हिरवीगार पाने म्हणजे फुलांशी
लाडीगोडी करणार्या वात्रट मैत्रिणीच. पहा कशा फुलांशी लगट करताहेत. फुलांसोबत नाचताहेत. निसर्ग आपल्याला या सौंदर्याला
अनुभवण्यासाठी सुंदर नजर देतो. मग
आपल्याला अधिक ते काय हवे? या
निसर्गासोबत राहून धरतीचा सृजनोत्सव आपण साजरा करायचा असतो. म्हणूनच आपण सण उत्सवांच्या निमित्ताने
सृष्टीला पूजतो. किती अप्रुपाचा हा सोहळा नाही? निसर्गाने आपल्याला जे जे दिले आहे, तेच आपण आपल्या सण उत्सवांमध्ये वापरत
असतो. म्हणूनच या निसर्गाचे उपकार मानावे
तेवढे कमीच आहे.
श्रावण
मास सुरू झाला असल्याने देऊळ, मंदिरांमध्ये
भक्तीत्सोव चालू आहे. या
सृष्टी देवतेने बहाल केलेल्या कुसुमांचा गंध प्रासादात परिमळतो आहे. पुढील काही दिवस श्रावण मासाचा
आनंदोत्सव देवळा मंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. निसर्गाच्या , सृष्टीच्या या अलौकिक सोहळ्याचे कौतुक
पाहुनच आपल्याला, आपले हे जीवन खुलवायचे आहे, सुखी करायचे आहे.
कालिका
बापट

No comments:
Post a Comment